Sunday 21 August 2022

३३ कोटी ?? देव ! (33 crore ?? Gods !)


देव म्हटलं की आपल्या मनात विचार येतात ते ३३ कोटी देवांचे. नक्की कोणत्या देवाची उपासना करायची? पण आपण फार कमी वेळा हा प्रश्न विचारतो की खरंच ३३ कोटी इतके देव आहेत? असतील तर कोणते? आणि या सगळ्याचं प्रयोजन तरी काय? आज या लेखात मी ३३ कोटी देव या संकल्पनेचा उलगडा करायचा प्रयत्न करणार आहे. 


दा म्हणजे देणे या धातूपासून देव हा शब्द आला आहे. जो केवळ देतो, जो इतका सर्व गोष्टींनी संपन्न आहे की काही मागत नाही तो देव. अशी ही साधी संकल्पना आहे. अर्थात याचे अजूनही अर्थ आहेत. पण इतक्या साध्या संकल्पनेचा विपर्यास झाला आणि वैदिक काळानंतर काही मतभेदांमुळे प्रत्येक शक्तीसाठी वेगळी देवता आली. असं असूनही प्रत्येक देवता अर्थपूर्ण आहे. देवतांची नावंही इतका विचार करून ठेवली गेली की त्या नावाच्या उच्चारानंही लाभ होतो. उदा: गणपती या नावात 'गं' बीज आहे जे बुद्धी, संकटं दूर करण्याची शक्ती देतं. त्यामुळे ह्या नामाचा जप केल्यास बुद्धी आणि शक्ती मिळते. अगदी बीज शक्ती बाजूला ठेवून विठ्ठ्ल हे साधं नाव पाहिलं तरी 'ठं' हा चंडिका मातेचा बीजमंत्र आहे. शिवाय ठ्ठ या अक्षराच्या सततच्या उच्चारामुळे, जोराच्या उच्छवासामुळे फुफ्फुस आणि हृदय यांना व्यायाम मिळतो. त्यामुळे विठ्ठलाचा जप केल्यास आरोग्य सुधारेल या मताला वैज्ञानिक आधारही आहेच. प्रत्येक देवतेच्या नावामागे काही गूढ पण वैज्ञानिक कल्पना आहेत. हे सगळं इतकं साधं आणि विचारपूर्वक असूनही आपण व्यावहारिक विचार न करता अतिरेक व अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याचा योग्य वापर करत नाही.            

असो, आता हे ३३ कोटी देव कुठून आले? तर मुळात हा गोंधळ झाला आहे तो 'कोटी' या शब्दामुळे. कोटी हा शब्द आपण एक संख्या म्हणून वापरतो आणि तसाच तो इथेही लागू केल्यानं गोंधळ झाला आहे. संस्कृत भाषेमधील कोटि / कोटी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. १ करोड संख्या, धनुष्याचे वा पंजावरील मोठ्या नखाचे वाकलेले टोक, सर्वोत्तम / अत्युच्च असे अनेक अर्थ आहेत. यात 'टी' अक्षराच्या वेलांटीने फारसा अर्थ बदल मला आढळला नाही. माझ्या मते ३३ कोटी देव म्हणजे ३३ अत्युच्च शक्ती असा त्याचा अर्थ आहे. नंतरच्या काळात अर्थ न कळल्याने याचा १ करोड असा अर्थ घेतला गेला. आता हे ३३ देव कोणते हे समजून घेण्यासाठी आधी बृहदारण्यक उपनिषदातील एक संवाद समजून घेऊ. ऋषी याज्ञवल्क्य यांना शाकल्य यांनी देव किती आहेत असं विचारल्यावर याज्ञवल्क्य यांनी ३०३ व त्यानंतर ३००३ अशी उत्तरं दिली. शाकल्य यांनी तोच प्रश्न केला तेव्हा याज्ञवल्क्य यांनी ३३ असं उत्तर दिलं. अजूनही योग्य उत्तर न मिळाल्यानं शाकल्यांनी नीट विचार करून उत्तर द्यायला सांगितलं. तेव्हा याज्ञवल्क्य यांनी ६ देव आहेत असं उत्तर दिलं. पुन्हा शाकल्य यांनी तोच प्रश्न टाकला. तेव्हा याज्ञवल्क्य यांनी ३ देव आहेत असं उत्तर दिलं. पुन्हा शाकल्य यांनी नीट उत्तर द्यायला सांगितलं तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले २ देव आहेत. त्यानंतर पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर याज्ञवल्क्य म्हणाले दीड म्हणजे एक पूर्ण व एक अर्ध देव आहे. आता मात्र शाकल्य चिडून म्हणाले हे काय उत्तर आहे? नक्की किती देव आहेत? त्यावर याज्ञवल्क्य म्हणाले एकच देव आहे. मग शाकल्य म्हणाले तू ज्या बाकीच्या संख्या सांगितल्यास ते देव कोणते? यावर याज्ञवल्क्य म्हणाले ३००३ हे देव मूळ ३३ देवांची विविध रूपं, शक्ती, तेज आहेत. ते मूळ ३३ देव म्हणजे ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, इंद्र व प्रजापती ("अष्टौ वसव एकादश रुद्रा द्वादशादित्यास्त एकत्रिंशदिन्द्रश्चैव प्रजापतिश्च त्रयस्त्रिंशाविति"). म्हणजेच मूळ शक्ती एकच आहे परंतु विविध कार्यांसाठी विविध रूपांत ही शक्ती अवतरली. तेच देव आहेत. याज्ञवल्क्य यांनी याबद्दल बोलताना त्यांची नावं आणि माहिती दिली. आता हे ३३ देव कोणते याची थोडक्यात माहिती देते.  

वसु: वसु या शब्दाचा अर्थ आहे तेज किंवा संपत्ती देणारा. वस् - राहणे किंवा वास करणे या धातूपासून वसु हा शब्द आला आहे. अत्यंत तेजस्वी अशा ह्या वसुंचं मूळ कोणतं हा वादातीत विषय आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही अदिती व काश्यप यांची मुलं आहेत तर काहींच्या मते मनू व ब्रह्मा यांची. निसर्गाचं व पंच महाभुतांचं प्रातिनिधित्व करणारे अष्टवसु हे मूळ ३३ देवांपैकी ८ मानले जातात. हे ८ वसु कोणते ते पाहू. 
         
१) पृथ्वी: अथांग किंवा अफाट अशा अर्थानं पृथ्वी ही संज्ञा वापरली आहे. आकाश तत्त्वाची पत्नी असलेली पृथ्वी जीवनदायी आहे हे उघड आहे. अवकाशातील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा पृथ्वीवर जीवन मोठ्या प्रमाणावर फुललं. 

२) वरुण: जल म्हणजेच पर्जन्य व समुद्राचा स्वामी असलेली वरुण देवता पश्चिम दिशेची पालक आहे. मगर हे वाहन असलेली व पाश हे आयुध असलेली ही देवता अत्यंत तेजस्वी आहे. व्र म्हणजेच बांधणे / घेरणे धातूपासून वरुण ही संज्ञा आली आहे. समुद्र वा जल रूपाने पृथ्वीला घेरणारा वरुण जीवनदायीच आहे.    
३) अग्नि: अग्नि ह्या संज्ञेच्या व्याख्येबद्दल अनेक मतं आहेत. मला योग्य वाटलेली व्याख्या म्हणजे अग्रि (अग्र / प्रथम) जो सर्वप्रथम अवतरला तो अग्नि. कारण आग, स्फोट अशा घटनांमुळेच अवकाशात ग्रह जन्माला आले. पाणी, योग्य हवा, जीवन हे सारं नंतर आलं. उत्तम शरीरयष्टी, लालसर रंग, हातात जपमाळ, मुकुटावरील अग्निज्वाळा ऊर्ध्वगामी, शरीरातून सात किरणं / ज्वाळा उत्सर्जित होत आहेत अशी ही मेंढ्यावर स्वार असलेल्या अग्निदेवतेची प्रतिमा असते. स्वाहा हे त्याच्या पत्नीचं नाव आहे. त्यामुळे अग्निला काहीही अर्पण करताना 'स्वाहा' म्हणलं जातं.     

४) वायू: हवा आणि श्वासाची देवता असलेला वायू हा प्राण म्हणूनही ओळखला जातो. कारण श्वास घेतल्याशिवाय जगणं अशक्य आहे. त्यामुळे जीवनशक्तींपैकी एक अत्यंत महत्त्वाची अशी ही तेजस्वी शक्ती आहे. घोडा किंवा काळवीटाच्य रथावर स्वार असलेला वायू हातात गदा / अंकुश घेऊन चपळ हालचाली करत असतो अशी त्याची प्रतिमा आहे. अत्यंत देखणा असलेला हा वसु दिक्पाल म्हणजेच दिशांचा स्वामी आहे. 

५) आदित्य: अदितीचे पुत्र असलेले १२ आदित्य आहेत. पण त्यातील सूर्याला इथे आदित्य संबोधलं आहे. दोन्ही हातात कमळ असून सात घोड्यांच्या रथावर स्वार असलेला, दैदिप्यमान अशी याची प्रतिमा आहे. संस्कृत छंदांवरून नावं असलेले गायत्री, बृहती, जगती, उष्णी, अनुष्टुभ, त्रिष्टुभ आणि पंक्ती असे हे ७ डौलदार घोडे आहेत. संध्या व छाया ह्या सूर्याच्या पत्नी आहेत. अरुण हा त्याचा सारथी असून सूर्याचं प्रचंड तेज जीवांना त्रासदायक होऊ नये म्हणून ब्रह्मानेच अरुणाची नियुक्ती केली अशी कथा आहे. 

६) आकाश: द्यौष वा द्यौष्पितृ नावाने ओळखला जाणारा हा वसु म्हणजे अथांग, पोकळी किंवा अवकाशाचं नाव आहे. मुख्यतः पितृ किंवा वडिलांची भूमिका बजावणारा हा वसु आहे. गर्जना करत येणारा आणि पृथ्वीला घाबरवणारा बैल अशी याची प्रतिमा आहे. 

७) चंद्र: तेजाने चमकणारा असा चंद्राचा शाब्दिक अर्थ आहे. सोम या नावाने ओळखला जाणारा हा वसु शुभ्र अंगाचा असून काळवीट जोडलेल्या रथावर आरूढ झाला आहे अशी त्याची प्रतिमा आहे. सोम या रूपात तो हातात गदा धरून तीन चाकी रथावर आरूढ झालेला आहे ज्याचे घोडेही शुभ्र आहेत. चंद्राला २७ पत्नी असून काही ठिकाणी याला वृक्ष, नदी यांचा पालक मानतात. सोमरस या पेयामुळेही काही वेळा असा उल्लेख होतो. 

८) तारे: अवकाशातील अत्यंत तेजस्वी तारे हे सुद्धा वसुच आहेत. आपला त्यांच्याशी थेट संबंध नसला तरीही अवकाशातील हालचालींवर सगळ्याच ताऱ्यांचा परिणाम होत असतो. बऱ्याच ग्रंथांमध्ये मुख्यतः ध्रुव ताऱ्याचा विचार केलेला आढळतो पण सर्वच तारे वसु असावेत.      
   
आदित्य: आदिती देवीच्या पोटी जन्माला आलेला तो आदित्य असा याचा अर्थ आहे. काही वेळा आदित्य म्हणजे सूर्य असा अर्थ लावला जातो. पण तो एकच आदित्य नाही. एकूण किती आदित्य आहेत यावर मत मतांतरं आहेत. पण सारासार विचार करून १२ आदित्य ग्राह्य धरले जातात. असं असलं तरी हे १२ आदित्य कोणते यावरही अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळे संदर्भ सापडतात. त्यामुळे मला योग्य वाटलेल्या संदर्भातून मी १२ आदित्यांची थोडक्यात माहिती देते. 

१) विवस्वत: यालाच विवस्वन्त किंवा विवस्वान म्हणतात. हा आदित्य म्हणजे मनुष्य जातीचा जनक मानला जातो.  शरयू ही त्याची पत्नी आहे व यम, मनु,अश्विन इ. हे त्याचे पुत्र आहेत. हा इतका तेजस्वी आहे की एखाद्याच्या प्रखर गुणांचं वर्णन करताना विवस्वत म्हटलं जातं. 

२) आर्यमन्‌: हा आदित्य जोडीदार किंवा एखाद्या स्नेही वा सख्याचं रूप दर्शवतो. हा अश्व (नर व मादी) यांचा पालक आहे. आणि आपली आकाश गंगा अर्यमन्‌: पंथ: (milky way) हाच त्याचा पंथ (वहिवाट) आहे. 

३) त्वष्ट्र: किंवा त्वष्टृ हा आदित्य म्हणजे कलेची देवता आहे. तसंच हस्तकला, आभूषणं अशाही काही कलांचा तो स्वामी आहे. हस्तकला म्हणजे केवळ वस्तू वा इमारती नव्हेत तर स्त्रियांचे गर्भाशय व त्यातील तयार होणाऱ्या जीवांची रचनाही तो कल्पकतेनं करतो. तो सोमरसाचा पालकही आहे. याला बृहस्पती आणि इंद्राचा पिता मानलं जातं . हातात धातूची कुऱ्हाड घेऊन २ मादी अश्वांच्या रथावर आरूढ झालेला आहे अशी याची प्रतिमा आहे. 

४) सवित्र: सवित्र म्हणजे प्रेरक, प्रखर किंवा जीवनदायी जो सूर्याची प्रखरता म्हणून जन्माला आला आहे. म्हणून उगवत्या सूर्याला सवित्र म्हणतात व त्यानंतर सूर्यास्तापर्यंतच्या अवस्थेला सूर्य म्हणतात. गायत्री मंत्रातही याला सूर्य म्हणून नाही तर सवितुर् म्हणून संबोधलं गेलं आहे. अत्यंत वैभवशाली असणारा हा आदित्य पिवळा पोशाख घातलेला, सोनेरी डोळे व केसांचा, सुवर्णरंगी हातांचा, अत्यंत देखणा आणि गोड वाणी असलेला असा दर्शवला आहे. सुवर्णस्वामीच असलेला हा आदित्य कांस्य व शुभ्र पाय असलेल्या २ अश्वांच्या सोनेरी रथावर बसून पृथ्वी, स्वर्ग आणि अवकाशाला उजळवून टाकतो अशी याची प्रतिमा आहे. हा चर आणि अचर दोन्ही गोष्टींचं संरक्षण करतो म्हणजेच 'ऋत'चं पालन करतो. इतकंच नव्हे तर देवांना अमरत्व देतो आणि मनुष्याला आयुर्मान देतो. हा भूलोकाच्या वरील लोकांचाही पालक आहे. मृत्यूनंतर आत्म्याला गती यावी यासाठीही याची उपासना केली जाते.   

५) भग: हा संरक्षक किंवा स्वामी असलेला आदित्य आहे जो वैभवाचं स्वामित्व करतो. प्रत्येक मनुष्याला त्याच्या कष्टाचं योग्य फळ व त्याचा वाटा मिळावा याची जबाबदारी तो घेतो. हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी आहे. 

६) धात्र: हा आदित्य आरोग्य व चमत्कारी गोष्टींचा पालक आहे. तांत्रिक विद्येत आणि मोठमोठ्या यज्ञांमध्ये याचं आवाहन केलं जातं.     

७) मित्र ८) वरुण: मित्र आणि वरुण हे जोडीदारच आहेत आणि एकत्रच संबोधले जातात (द्वंद्व). वसु असलेला वरुण आदित्यही आहे. मित्र हा मैत्री, वचन यांचा स्वामी आहे. तो वाद टाळतो आणि स्नेह भावना जागृत करतो. मित्र पहाटे आणि सकाळी कार्यरत असतो तर वरुण संध्याकाळी कार्यरत असतो. पृथ्वी आणि स्वर्गामधील जागेत मित्र - वरुण यांचं आवाहन केलं जातं. ते सुवर्ण महालात राहतात ज्याला हजारो खांब, दरवाजे आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे. ते असुर असल्यानं 'माया' किंवा गारुड करून ते अनेक गोष्टी साध्य करतात. असत्य बोलणाऱ्याला ते शिक्षा करतात म्हणून तेही 'ऋत' पाळतात. सूर्याचं मार्गक्रमण यांच्या मायेमुळे होतं आणि सुर्यकिरणांना हातात धरून ते त्यांचा रथ चालवतात असं काही ग्रंथांत दर्शविलं आहे. 

९) अंश: हवा ही जगण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हवा कुठेही प्रवेश करू शकते. याच रूपात प्रत्येक जीवाचा एक अंश / भाग बनलेला हा आदित्य आहे. ह्या आदित्यानं सर्व जीव भरलेले आहेत.  

१०) पूषन्: पुष्यति म्हणजे भरभराट करणे या धातू पासून हे नाव आलं आहे. हा आदित्य मिलन, मेळ, भेटीगाठी यांचा कारक आहे. त्यामुळे विवाह, प्रवास, रस्ते, पशु खाद्य यांचं पालकत्व करतो. हा आत्म्याचा मार्गदर्शक आहे जो आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जातो. स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग (रस्ता) आणि अनेक दैवी रस्ते याला ठाऊक आहेत. हा प्रवाशांचे हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करतो. हा अत्यंत तेजस्वी आदित्य आहे ज्याच्यामुळे देवांना आसुरांवर त्यांनी वापरलेला अंधार दूर करून विजय मिळवता आला. जटाधारी  केस,दाढी असलेला हा आदित्य बकरा / शेळी जोडलेल्या रथात बसलेला दाखवला आहे. हातात सोन्याची कुऱ्हाड, अंकुश, आरी घेतलेला पूषन् काही ठिकाणी तोंडात एकही दात नसलेला दाखवला आहे (याचे वेगवेगळे संदर्भ आहेत).   

११) इंद्र: देवांचा राजा असलेला इंद्र प्रचंड शक्तींनी युक्त असा आदित्य आहे. तो प्रत्यक्ष सूर्य स्वरूप आहे. इंदू म्हणजे पावसाचा थेंब म्हणून ज्याने पर्जन्याला जिंकून पृथ्वीवर आणले तो इंद्र अशी एक व्याख्या आहे. ४ सुळे असलेल्या शुभ्र हत्ती - ऐरावतावर आरूढ होऊन हातात वज्र आणि धनुष्य घेतलेला आणि जबरदस्त इच्छाशक्ती असणारा अशी त्याची प्रतिमा आहे. पर्जन्य अडवून धरलेल्या वृत्र या मोठ्या सर्पाला (असुर) वज्राच्या सहाय्यानं मारून पृथ्वीवर पुन्हा पर्जन्य आणल्यामुळे तो पर्जन्य, वीज, स्वर्ग, देव सर्वांचाच राजा आहे. शचीशी विवाह झालेला असतानाही इतर स्त्रियांचा मोह त्याला आवरला नाही. त्यातच अहिल्येबद्दलच्या वर्तणुकीमुळे त्याला गौतम ऋषींकडून शापही मिळाला अशा कथा आहेत.    

१२) वामन: श्री विष्णूंचा अवतार असलेला वामन हा आदित्य आहे. जेव्हा बळी या महासुरानं प्रत्यक्ष देवराज इंद्राला पराभूत केलं तेव्हा सर्व देव विष्णूंना शरण आले. इंद्राला त्याची सत्ता परत मिळावी म्हणून विष्णूंनी आदितीच्या पोटी एक बुटका - वामन म्हणून जन्म घेतला. एका यज्ञाच्या वेळी बळीकडे चतुराईनं वामनानं ३ पाऊलं जमीन मागितली. बेसावध बळी तयार झाला आणि वामनरुपी विष्णूंनी तीन पावलात तिन्ही लोक जिंकून इंद्राला त्याची सत्ता परत मिळवून दिली. म्हणजेच प्रत्यक्ष श्री विष्णु हेच आदित्य आहेत. संपूर्ण जागाचे पालनकर्ते असलेले विष्णु निळ्या वा श्यामरंगी रंगाचे आहेत. त्यांच्या हातात कमळ, कौमोदकी गदा, पांचजन्य शंख आणि सुदर्शन चक्र आहे. शेष नागावर बसलेले अशी त्यांची प्रतिमा आहे आणि गरुड हे त्यांचं वाहन आहे.       

रुद्र हा शब्द रुद् धातू पासून आला आहे. म्हणजे आक्रोश / गर्जना करणे. तसंच रुदन (रडणे) हाही एक अर्थ आहे. तसेच त्याचे आणखी अर्थ आहेत. जो सर्व अडचणी मुळापासून दूर करतो असा तो रुद्र. रुद् म्हणजे लाल वर्ण म्हणून तो रौद्ररूपी (भीतीदायक) आहे. रुद्र ही वेगळी देवता आहे की शिव म्हणजेच रुद्र यावर अनेक मतं आहेत, काहींच्या मते हे भगवान शिवांचे अवतार आहेत. वायू, वादळ, शिकार करणे या गोष्टींचा रुद्र हा कारक आहे. रौद्र हे भयंकर आणि रुदन (आक्रोश) करणारा अशी त्याची रूपं आहेत. हाती त्रिशूळ, हरीण घेऊन व्याघ्रचर्म परिधान केलेला, मुंडक्यांची माळ घालून चिताभस्म लावलेला अशी त्याची प्रतिमा आहे. भगवान शिव हे अत्युच्च ब्राह्मण असल्यानं स्थाणु - स्थिर आहेत. त्यांनी विविध कार्यांसाठी ११ अवतार घेतले, तेच हे रुद्र अशीही एक कथा आहे. काहींच्या मते ५ इंद्रियं (डोळे-दृष्टी , नाक-श्वास, कान-ऐकणे, जीभ-चव, त्वचा-स्पर्श) , ५ कर्मेंद्रिय (मुख, हस्त, पाद, मलद्वार, मूत्रद्वार) आणि आत्मा म्हणजे ११ रुद्र. आता ११ रुद्र कोणते आहेत ते पाहू. 

१) मन्यु: म्हणजे प्रत्यक्ष नरसिंह देवता. उत्कटता म्हणजे मन्यु. म्हणून हे रूप रागीट, लढाई करणारं, वीज हे शस्त्र असणारं आणि शत्रूंचा विनाश करणारं असं दाखवलं आहे. 

२) मनु: मनु म्हणजे आद्य मानव. मनुष्य ही मनुचीच वंशावळ आहे. एकूण १४ मनु आहेत. त्यातील प्रथम मनु म्हणजे स्वयंभुव मनु यानं मनुस्मृतीची निर्मिती केली. बारावा मनु म्हणजे रुद्र-सवर्णी मनु. काही ठिकाणी याचा उल्लेख शिव पार्वतीपुत्र म्हणूनही केला आहे. प्रत्येक 'कल्प' काळात एक एक मनु जन्माला आला.            

३) महान: हा सर्वव्यापी शिवासारखाच महान रुद्र आहे. 

४) महिनस: या सूक्ष्म जगाचा हा देव आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील क्षेत्राचा तो स्वामी आहे.     

५) शिव: प्रत्यक्ष भगवान शिव यांना रुद्र म्हटले आहे. शि - सर्वव्यापक, व - कृपेचे मूर्त रूप. म्हणजेच ज्याच्यात सर्व सामावलेले आहे आणि जो काहीही देऊ शकतो (मागत नाही) तो शिव. शर्व म्हणजे मारणे, जो वाईट शक्तींचा नाश करतो तो शिव. अशा अर्थानं 'शिव' या रूपातच ते रुद्र आहेत.       
 
६) भव: भव म्हणजे जन्म, अस्तित्व, भावना. स्वतःचं अस्तित्व जागृत करणे, मानसिक स्थैर्य अशा गोष्टींचा हा कारक आहे. 

७) काम: काम म्हणजे इच्छा (लैंगिक व मानसिक). चार पुरुषार्थांपैकी एक म्हणजे 'काम' कारण त्याशिवाय आयुष्य पुढे जाणार नाही. पण काम म्हणजे केवळ लैंगिक भावना नाही तर कोणत्याही गोष्टीचा मोह, कलेपासून मिळणारा आनंद, अनेक प्रकारच्या भावना असा याचा फार गहन अर्थ आहे. हा रुद्र मनुष्याच्या आयुष्यातल्या अनेक उत्कट गोष्टींचा कारक आहे. 

८) वामदेव: पराशिवरूपाच्या (पंचमुखी शिव) पाच मुखांपैकी एक म्हणजे वामदेव व बाकीचे म्हणजे सद्योजात, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. हा रुद्र शांतीप्रिय, डौलदार आणि कवि मनाचा आहे. हवा आणि जीवनावश्यक ऊर्जा यांचा स्रोत असलेला हा रुद्र विष्णूंशीही संबंधित आहे. 

९) उग्ररेत: रेत म्हणजे वीर्य, पुरुषार्थ. नावाप्रमाणेच हा रुद्र उग्ररूपी आहे. उग्र भावना, जीवन ऊर्जा अशा गोष्टींचा हा कारक आहे. 

१०) ऋतध्वज: ऋत म्हणजे चराचर, पृथ्वी सगळ्याचं योग्य संतुलन राखणं. ऋताचं पालन व संरक्षण अशी मोठी जबाबदारी असलेला हा रुद्र एक उत्तम शासक आहे. 

११) धृतव्रत: धृतव्रत म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचं पालन करणारा, विश्वासू. म्हणूनच सृष्टीतील हालचाली नियमाप्रमाणे घडवून आणणे, पृथ्वीवर व्यवस्था बिघडू न देणे अशा गोष्टींचा हा कारक आहे.                 

अशा प्रकारे ३१ देवतांचं वर्णन आहे. आता ३२वी देवता म्हणजे इंद्र. देवांचा राजा इंद्र हा एक आदित्य आणि स्वतंत्र देवताही आहे. ३३वी देवता म्हणजे प्रजापति. हा निर्माण करणारा म्हणजेच विश्वाचा निर्माता आहे. अनेक ग्रंथांमध्ये प्रजापति व ब्रह्मा एकच आहेत असा संदर्भ आहे. पण हे दोन वेगवेगळे देव आहेत. प्रजेचा पति म्हणजेच निर्माता असा याचा अर्थ आहे. स्वर्ग, पृथ्वी, चराचर, देव, असुर, पुरुष (वैश्विक ऊर्जा), हिरण्यगर्भ यांचा हा जनक आहे. निर्मिती साठी वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये देव वा ऋषी यांची रूपं घेऊन प्रजापति अनेक रूपांत अवतरले असा एक संदर्भ आहे. उदा: रुद्र, मनु, सूर्य, यम, दक्ष इत्यादी.             

अशा प्रकारे हे ३३ देव वा शक्ती आहेत. तरीही अनेक ग्रंथांमध्ये याची सूची वेगवेगळी आहे. त्यामुळे माझ्या मते यावरील मतभेद टाळून आताच्या काळाला साजेल असा व्यावहारिक विचार आपण करावा. पण आपणच देवतांनी काय करावं - काय नाही हे ठरवल्यासारखं वागतो. त्यामुळे देव कुठेही चुकत नाहीत, देवाला कामभावना, लोभ अशा भावना नसतात अशा भ्रामक कल्पनेमुळे आपणच दैवी शक्तींपासून लांब जात आहोत. उदा: कोणताही ग्रंथ पहा. थोडेफार संदर्भ बदलले तरी देवराज इंद्र आणि अहिल्या यांची कथा, शिव शंकरांनी गणेशाचं मस्तक उडवणं, श्री विष्णूंना गर्व होणं, भगवान शिव यांचं रावणाच्याही साधनेला भोळेपणानं भाळणं या गोष्टी हेच दर्शवतात की भावना देवांनाही आवरत नाहीत. मग मनुष्य त्यापुढे काहीच नाही. तसंच प्रत्येक देवाचं रूप, कार्य, कथा यांत एक रूपक दडलेलं आहे. ही सांकेतिक भाषा न समजल्यामुळे अनेक गैरसमज तयार झालेत. रूपकाची साधी उदाहरणं आणि त्याचा आजच्या भाषेतला अर्थ पहा. सवित्र याची प्रतिमा म्हणजे तो कांस्य व शुभ्र अशा दोन अश्वांच्या रथावर स्वार आहे. सूर्य उगवताना आकाशात लालसर व शुभ्र असे रंग दिसतात जे प्रखर नसतात. गायत्री मंत्रात सवित्र उल्लेखला आहे कारण तो उगवत आहे, पुढे जाणार आहे पण अति प्रखर नाही. सूर्याचा सारथी अरुण आहे. सूर्याच्या प्रखर तेजामुळे पृथ्वीच्या जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून याची नियुक्ती झाली आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर ओझोन वायूच्या आपल्याभोवतीच्या संरक्षक भिंतीमुळेच आपण सुरक्षित आहोत. अन्यथा सूर्याची किरणं आपल्याला जाळून टाकतील. मग अरुण हेच ओझोनचं सांकेतिक नाव असेल. अनेक देवतांची वाहनं म्हणजे उंदरापासून मोरापर्यंतचे प्राणी - पक्षी. कोणत्याही प्राण्याला कमी लेखू नये, उगीच मारू नये यासाठी हा प्रयत्न आहे. शिव शंकरांनी गणेशाचं मस्तक उडवल्यावर तिथं हत्तीचं मस्तक जोडलं. आजच्या भाषेत ही एक मोठी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाच आहे ना? दुर्गा मातेनंही वाघावर स्वार होऊन दुष्टांची हत्या केली. म्हणजे आजच्या भाषेत भीषण गुन्हा करणाऱ्याला मृत्युदंड ठोठावला. स्त्री ही सबला असेल तर गुन्हेगाराला ती अशी शिक्षा देऊ शकते याचंच हे रूपक आहे. वेळ पडल्यास स्वतःला वाचवण्यासाठी असं पाऊल उचलणं हा गुन्हा नाही हे कायदाही मान्य करतो. आणि इथं वाघ म्हणजे केवळ प्राणी नाही तर स्त्रीच्या मानाचं रूपक आहे. स्त्रीनं ठरवलं तर ती कठोर होऊन कोणालाही नियंत्रित करू शकते असा त्याचा अर्थ आहे. अर्थात या सगळ्यांचे चुकीचे अर्थ लावले जाऊन गैरवापर होऊ नये म्हणून काही कथा लिहिताना ग्रंथांमध्ये बदल केले गेले. पण आपल्या 'देव' या संकल्पनेत कोणतीही स्त्री अबला नाही.   

आता अशा सगळ्याच गोष्टी एका लेखात लिहिता येणार नाहीत. पण सद्सद्विवेकबुद्धीनं आपण प्रत्येक दैवी संकल्पनेचा अर्थ लावू शकतो. असे अनेक सुंदर अर्थयुक्त, निसर्गाला जपून आपल्या आयुष्याला योग्य मार्ग दाखवणारे हे 'देव' आपण नुसते समजून घेऊ नयेत तर आताच्या युगात त्यांचा योग्य तो अर्थ लावून साधना, पूजा, सणवार यातही बदल केले पाहिजेत. देव जर कायमस्वरूपी आहेत तर काळानुसार या गोष्टी बदलायला हव्यात कारण शक्ती तीच असली तरी प्रत्येक युगात त्याचा अर्थ वेगळा असणार हे उघड आहे. आज आपण हे सर्व मांडतो आहोत तीच भाषा शेकडो वर्षांनी 'पौराणिक' झालेली असेल. आणि आत्ताच्या आपल्या संदर्भांना तेव्हा हास्यास्पद ठरवलं जाऊ शकतं. म्हणूनच विज्ञानवादी जरूर असावं पण इतिहास वाचताना कोणती कसोटी लावतो आहोत याचं भान ठेवावं. तसंच दुसरी बाजू पाहता अट्टाहास म्हणून काही व्यावहारिक गोष्टी स्वीकारायच्या नाहीत, बदल करायचे नाहीत अशा धोरणामुळे आपले देव काय आहेत हे आपल्यालाच कळलं नाही तर पुढच्या पिढीला काय समजावून सांगणार? जुने संदर्भ जसेच्या तसे आज कसे वापरता येतील? तशीच जीवनशैली आज आहे का?  सगळ्याचा विचार करून अंधविश्वास आणि अविश्वास दोन्ही टाळावं . कुठेही अतिरेक न करता योग्य पद्धतीनं आचरण, पूजन, साधना केली तरच 'देव' आपल्याला समजून घेता येतील. आणि आपली संस्कृती काळानुसार बदलली तर नुसती टिकून राहणार नाही तर तिच्याबद्दलचा आदरही वाढेल.              

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.

         ===========================================


When it comes to God and worship the first thought comes to our minds is about the 33 crore Gods (Hinduism). Exactly which God to worship? But we hardly try to seek an answer for the existence of 33 crore Gods. And if yes, who are they? What is the purpose of this theory? Well, in this article I am trying to unfold some concepts behind the theory of 33 crore Gods.

God known as Dev in Sanskrit, derives from the root da which means to give. The one who is so prosperous that he is only a giver and never asks for anything is Dev. This is such a simple concept. Although there are some other definitions of it. But the perversion of this simple derivation and due to some differences of opinions after the Vedic era, a separate God was created for every energy. Nonetheless every God is meaningful. Even the names of the Gods are created so thoughtfully that chanting the names gives benefit. E.g. The name Ganapati has 'Gam' beej (seed), which gives wisdom, power to remove obstacles. Thus chanting this name gives us wisdom and power. Lets keep aside the energies of beejas and consider a simple deity name Vitthala. This name has 'Tham' beej which is Chandika Goddess's beej. Also chanting the alphabet 'tha' again and again gives a good exercise to lungs and heart due to the emphatic exhalation during pronunciation. So when someone claims that the chanting of Vitthala can improve your health, it has some scientific basis too. Every God's or deity's name is based on a secret but scientific concept. This whole system is so simple and thoughtfully created but sadly we neither apply our logic nor implement it properly due to ostentations and superstitions. 

Well, now from where these 33 crore Gods came to existence? Basically this confusion has been created due to the word crore i.e. 'koti' in Sanskrit. Koti is a word also used to denote a number which is 10 million and its same meaning is always applied here which has created this baffle. Koti / Kotee in Sanskrit has lots of meanings like 10 million, supreme, curved end of bow or claws etc. I didn't find any difference in the meaning due to the representation of the vowel ee or i with the alphabet t. In my opinion 33 koti Gods means 33 supreme powers. In later years due to the misinterpretation of the word koti it as simply translated to 33 crore Gods. Still to know exactly who are these 33 Gods lets understand one conversation from Brihadaranyak Upanishad. Sakalya asked Sage Yadnyavalkya about the number of Gods and he replied as 303 and later 3003. Again Sakalya asked the same question. This time Yadnyavalkya answered "There are 33 Gods". Still unsatisfied with the answer, Sakalya repeated the question then Yadnyavalkya answered "There are 6 Gods". Now again Sakalya asked the same question and told Yadnyavalkya to answer thoughtfully. This time Yadnyavalkya answered "There are 3 Gods". Again Sakalya asked him about it. Yadnyavalkya replied "There are 2 Gods". Again on the same question Yadnyavalkya replied "there are one and a half Gods". Now Sakalya was infuriated and asked "Is this even an answer? How many Gods are there?" Yadnyavalkya replied "There is only one God". Then Sakalya asked "Then what were the other Gods whose numbers you mentioned?" On this Yadnyavalkya replied that the 3003 Gods are the manifestations, glories, radiances of the 33 Gods. Those principle Gods are 8 Vasus, 11 Rudras, 12 Adityas, Indra and Prajapati ("अष्टौ वसव एकादश रुद्रा द्वादशादित्यास्त एकत्रिंशदिन्द्रश्चैव प्रजापतिश्च त्रयस्त्रिंशाविति"). This means the principle force is only one. But it manifested in different forms for various purposes. These manifestations are Gods. Yadnyavalkya further explained their names and information. Now I will try to provide the information about the 33 Gods in brief. 

Vasus: Vasu means the one who gives billiance and wealth. In Sanskrit Vas (root) means to live (in) which formed the word Vasu. The exact origin of the Vasus is debatable. Some scholars say that these are the children of Kashyap and Aditi while others state that of Manu and Bahma. These 8 elemental Gods representing nature and five fundamental elements i.e. Panch Mahabhootas are considered as principle Gods amongst the 33. Now let's see who these 8 Vasus are.

1) Prithvi (Earth): The appellation is used to connote vastness, endlessness. A complementary to the Sky deity, the Earth is a life giver. Rather than any other planet in the universe the Earth has the most creatures living on it. 

2) Varun (Water): Water means the lord of rains and oceans is also the lord of the West. With Crocodile as it's mount and noose as its weapon this deity looks absolutely brilliant. It's name derived from the root Vra which means to bind or surround. It surrounds or binds the world in the form of water which itself is a life giver.   

3) Agni (Fire): There are different opinions on how the term Agni derived and what it denotes. The most appropriate definition according to me is Agri or the first arrived. In Sanskrit Agra means the tip / first, thus Agni is the first one to arise. Obviously the phenomena like bursts, explosions gave birth to the planets in the universe. Other things like water, air (for life), life developed later on. Though the iconography of Agni also varies commonly it is shown as a deity with a good physique, red complexion, rosary in a hand, flames leaping upwards from his crown, 7 rays of flame / rays emitting from his body and riding on a ram. Swaha is the name of his wife. Thus while offering anything to Agni it is recommended to pronounce her name. 

4)Vayu (Air): This lord of air and breath is also known as Prana (life force) as it is not possible to live without breathing. Thus it is one of the most vital life forces and depicted as a brilliant deity. His iconography shows him as very swift, riding on a chariot drawn by horses or gazelles with mace / goad as his weapon. This gorgeous deity is also a guardian of the directions i.e. Dikpal.  

5) Aditya (Sun): The sons of Aditi are known as Adityas who are 12 in number. But only the Sun is named as Aditya in this context. He is depicted as a blazing deity with lotus in both the hands and riding a chariot pulled by 7 horses. These 7 graceful horses have derived their names from Sanskrit Chandas (prosody) and they are Gayatri, Brihati, Jagati, Ushnih, Trishtubha, Anushtubha and Pankti. Sandhya and Chhaya are his wives. Aruna is his charioteer and appointed by Brahma to shield the living creatures from the radiant energy of the Sun. 

6) Akash (Sky): This Vasu representing the universe, the unfathomable vacuum is also known as Dyaush or Dayushpitru. This Vasu is mostly depicted as having a paternal role or is a fatherly figure. Its iconography shows him as a roaring bull scaring the Earth. 

7) Chandra (Moon): Chandra literally means shining with brightness. Also known as Soma, this Vasu has been depicted as white bodied, riding on a chariot pulled by an antelope. As Soma he is depicted as riding on a chariot with 3 wheels drawn by white horses and with a mace in hand. Chandra has 27 wives and at some places he is known as a guardian of rivers and trees; probably due to the drink Somarasa. 
 
8) Nakshatra (Stars): The brilliant stars in the universe are also Vasus. Though we can't directly relate ourselves with all stars, it is clear that the celestial phenomena do get affected by the stars. Mostly the scriptures consider only the Dhruv star as Vasu. But I feel all the stars are Vasus.

Aditya: Adityas refer to offsprings of Aditi. Mostly the term Aditya is used as a synonym for the Sun. But he is not the only Aditya. The exact number of the Adityas is a matter of scholarly debate. But all in all there are 12 Adityas. Nevertheless it is still debatable who these Adityas are. There are various references for their names, so I will try and provide a brief information of the 12 Adityas which I felt are appropriate. 

1) Vivasvat: He is also known as Vivasvant or Vivasvan. He is considered as the ancestor of the human race. His wife is Sharayu and Yama, Manu, Ashwins etc are his sons. He is so brilliant that to describe anybody's brilliance the term Vivasvat is used. 

2) Aryaman: This Aditya represents a partner, life partner or a companion. He is the guardian of Horses (stallions and mares). Our galaxy, the Milky way, is his path. 

3)Tvastr: Or Tvastru is a guardian of art. He is a lord of arts like crafting, ornaments etc. In the sense of a craftsman, he is not only the creator of buildings or nonliving things but he is also the crafter of living beings and womb. He is also the guardian of Soma. He is also considered as the father of Brihaspati and Indra. His iconography shows him wielding a metal axe and riding on a chariot pulled by 2 mares. 

4) Savitr: Savitr means impeller, divine influence, a life giver who is born as the vivifying power of the Sun. So the rising Sun is known as Savitr and from sunrise to sunset it is called Surya. In the Gayatri mantra he is referred as Savitur not Surya. In his iconography he is shown as a glorious personality with yellow clothes, golden eyes and hair, golden arms, handsome and with a pleasant tongue. Just like the lord of gold, this Aditya rides a golden chariot pulled by 2 bronze / white footed stallions and illumines   the Earth, heaven and the universe. He is the guardian of movable and immovable things i.e. 'rta' (ऋत). He grants immortality to the Gods and life span to the humans. He also guards the world of spirits, thus he is worshipped for the journey of the souls after death.  

5) Bhaga: This Aditya is a protector or a lord who is the God of wealth. He makes sure that all people will receive their share of goods and wealth. He is the lord of Uttara phalguni nakshatra.  

6) Dhatr: This Aditya is a lord of health and magic. He is specially worshipped in Tantric sadhanas and major homa or yajnyas.  

7) Mitr: 8) Varuna: Mitra and Varuna always appear in a pair and are referred as dwandwa (inseparable / attached).  Varuna is both Aditya and Vasu. Mitra refers to agreement, friendship or treaty. He avoids confrontations and encourages bonding. Mitra is active from dawn to morning period while Varuna is active in the evening time. They are invoked to the place between heaven and Earth. They live in a golden palace with thousands of pillars and doors. They are Asuras, so they wield their powers through secret knowledge or 'maya'. They punish the people who don't speak the truth, thus they conduct 'rta'. Some texts describe them as using their 'maya' to make the Sun traverse the sky and drive their chariot with the rays of the Sun. 

9) Ansh: Air is the most important thing needed for life and air can enter anywhere. This Aditya has become a life element in this form. He has been enshrined in every body and life is full of him.  

10) Pushan: The name Pushan derives from the Sanskrit verb pushyati which means to make (others) prosperous. This Aditya is a lord of marriages, roads, feeding of cattle and travel. He is the guide of the souls and conducts the souls to the other world. He has knowledge about the road to heaven and many other divine paths. He protects the travelers from wild animals. He is such a radiant Aditya that even the Gods could defeat the darkness of the Asuras with his help. In the iconography he is shown as having braided hair and a beard and rides on a chariot drawn by a goat. He carries a golden axe, awl and a goad. In some scriptures he is shown as having no teeth in his mouth (references vary).     

11) Indra: The king of the Gods himself is a very powerful Aditya. He is as brilliant as the Sun. One of Indra's definitions is - Indu means raindrop, so the one who conquered the rain and brought it back to Earth is Indra. He is shown as riding on an elephant with 4 tusks known as Airavat with lightning thunderbolt (Vajra) and a bow as his weapons and has tremendous will power. He killed the evil serpent Vritra, who held back the rains with his thunderbolt and released the rains to nourish the Earth; thus he is the king of rains, lightning, heaven and the Gods. Even though he is married to Shachi he had extra marital affairs. In one such incident he got cursed from sage Gautama due to his misbehaviour with Ahilya.  

12) Vamana: This incarnation of Lord Vishnu is also an Aditya. When the king of the Gods Indra was defeated by the noble Asura named Bali, all Gods sought refuge in Lord Vishnu. To help Indra restore his power, Vishnu incarnated as a dwarf called Vamana, Aditi's son. With astuteness Vamana asked for only 3 steps of land at the time of one ritual sacrifice. Heedlessly Bali agreed to it and Vamana being Vishnu himself, covered the worlds in three strides and restored Indra's power. This means Lord Vishnu himself is the Aditya. The preserver of the whole world Lord Vishnu is depicted as blue or dark skin coloured. He carries lotus, mace (Koumodaki), conch (Panchajanya) and war discus Sudarshan chakra. He is shown to be reclining on the coils of the serpent Shesha naga and his mount is Garuda, the eagle.  

Rudra is a name derived from the root Rud means to cry or howl. Also Rudan means to cry. The word Rudra has many other meanings though. Basically it means (here) is the one who removes all obstacles. Also Rud means iron or red coloured. So the one who is Roudrarupi or fearsome is Rudra. Now whether this Rudra is a separate deity or Lord Shiva himself is a matter of scholarly debate. Some scholars claim that Rudras are the incarnations of Lord Shiva. Rudra is considered as a lord of wind, storms or hunt. It has two forms, Roudra a fearsome form and Rudan a crying form. In the iconography a Rudra is depicted as carrying a trident and a deer in hand and wearing tiger skin with a garland of skulls and applying ashes from a pyre. Lord Shiva is an eminent Brahmana so he is Sthanu (stationary). So he incarnated in the form of different Rudras according to some texts. According to some 5 Indriyas (eyes-vision, nose- breath, ears-hearing, tongue-taste, skin-touch), 5 Karma indriyas (mukha-mouth, hasta-hands, pada-legs, maladvara-anus, mutradvar-genital) and atma (soul) are 11 Rudras. Now let's see who are these 11 Rudras.
  
1) Manyu: This means Lord Narasimha himself. Passion is Manyu. Thus he is depicted as fierce, war God, wielding thunder and slayer of foes. 

2)Manu: Manu means progenitor of humanity. There are 14 Manus in total. The first Manu i.e, Svayambhuva Manu created Manusmriti. Twelfth Manu is the Rudra known as Rudra-Savarni Manu. In some places he is referred as the son of Shiva and Parvati. Every Manu was born in one Kalpa period respectively. 

3) Mahan: This Rudra is as almighty as Lord Shiva. 

4) Mahinas: This Rudra is a divinity of the subtle world between the Earth and the Sun. 

5) Shiva: Lord Shiva himself is referred as Rudra here. Shi means pervasiveness and va means embodiment of gace. Thus Shiva means the one in which everything lies and who can give anything (never requests). Sharva means killing, the one who kills evil forces is Shiva, is another meaning. Thus he is a Rudra in his 'Shiva' form.

6) Bhava: Bhava means birth, existence, emotions. This Rudra is a lord of emotional stability or realizing about self / existence. 

7) Kama: Kama is desire (sexual / emotional). It is one of the four goals (purushartha) of human life, as without Kama human life can not progress. But Kama is not only the sexual desire, but a despisition for anything, enjoyment through art or many other things; it is an abstruse term. This Rudra is a lord of passionate things in human life.    

8) Vamadeva: He is one of the five faces of Parashiva. Others are Sadyojata, Aghora, Tatpurusha and Ishan. This Rudra is peace loving, elegant and a poet. The source of air and life force, this Rudra is also associated with Lord Vishnu. 
  
9) Ugrareta: Reta means semen, manhood. As the name suggests, this Rudra is aggressive. He is the lord of force, life force. 

10) Rtadhvaja: Rta means balancing movable and immovable creatures, the Earth as a whole. This Rudra has a huge responsibility to follow and guard Rta and is a good ruler.

11) Dhrutavrata: Dhrutavrata means the follower of law and order, a trustworthy. Thus he is responsible for the phenomena in the universe and managing the Earth. 

These are the 31 Gods. Now the 31st God is Indra. The king of the Gods Indra is an Aditya and a separate deity also. The 33rd God is Prajapati. He is the creator of the universe. Many texts consider Pajapati and Brahma as one and the same. But these are different Gods. Prajapati is the lord of the people or their creator. He is the creator of heaven, Earth, movable and immovable, Gods, Asuras, eternal force and the cosmic egg. According to some, during the creation process Prajapati incarnated in different forms of Gods or sages in different manvantaras (periods) viz; Rudra, Manu, Sun, Yama, Daksha. 

These are the 33 Gods or divine forces. Though many texts give different lists of the 33 Gds. So I feel we should avoid such debates and should practically think about this considering today's world. Rather than being practical we behave as if we decide the dos and don'ts for the Gods. Due to impractical thinking we are entangled in delusional ideologies like Gods never go wrong, they don't have desires (like sexual / greed) etc and we are going away from the divine powers. E.g. consider and sacred text. Some minor details may differ but the story of Indra and Ahilya, Lord Shiva beheading Lord Ganesha, Lord Vishnu's pride or ego, Lord Shiva going sweet on Ravana's worship etc. All these examples show that even Gods get carried away at some point. So a normal human being is nothing compared to these. Nevertheless, every God's form, duty, stories have symbolically represented some important point. The lack of proper interpretation of this symbolism has created many misunderstandings. Let's interpret some of these simple symbolic representations. Savitr is shown as riding on a chariot pulled by bronze or white footed stallions. At the time of Sunrise the sky has shades of bronze - red and white and they are not torrid. Gayatri mantra also mentions Savitra as it is going to rise and go ahead but not intense. The Sun's charioteer is Aruna. He has been appointed to save the Earth and life from the extreme brilliance of the Sun. Now in today's language the ozone layer around the globe saves us from the hot rays of the Sun. Otherwise the Sunrays if directly reach the Earth can burn us. Then Aruna can be the symbolic name of the Ozone layer, isn't it? Look at any God's mount; these are all big small creatures from rats to peacocks. This was probably made to save animals and not underestimate even the smallest animal. Lord Shiva beheaded Ganesha, but joined an elephant's head on his shoulders. Isn't it a big transplantation surgery in today's language? Durga mata was riding on a tiger and killed the evil demons. It represents that women empowerment can lead to proper justice and self defence is not a crime which is accepted by the law system itself. Here the tiger is not only an animal but a symbol of a woman's mind that she can become as strong and ruthless as a tiger if needed. Of Course such symbolic points are slightly altered in the texts to avoid misuse or wrong interpretations. But in our concept of Gods no woman is powerless or helpless.   

Now all such interpretations can't be explained in a single article. But with rational thinking and discretion we can understand the symbolism behind the concept of every God. It is not enough to understand these beautiful, meaningful and nature conserving divine preachers, but we have to change our way of worship, festivals etc according to today's needs. If Gods are immortal then we have to change certain paths as the divine energy is going to be the same but will be interpreted differently in every era. Our today's language explaining these theories will be a 'mythology' after hundreds of years. And today's references may become amusing in future. Therefore it is definitely good to think scientifically or logically but we should also consider the parameters used for checking the history facts. On the flip side, adamant orthodox behaviour like not accepting the changes, not being practical will not help us to understand our own Gods; then what are we going to teach our future generations? How can we use old references on as it is basis? Is our lifestyle the same as it was then? Considering all things we should avoid both superstition and disbelief. If we stop overusing and properly conduct worship and behaviour, then only we can understand the GOD. And our beautiful culture will not only be preserved but also will be respected more.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
     ================================================