Tuesday, 3 December 2019

गुरु (Guru)



आपण अनेकदा कोणीतरी 'माझे गुरु' असं म्हणताना ऐकतो. किंवा मलाही एक ज्योतिषी म्हणून 'मला अध्यात्मिक गुरु कधी लाभेल?' असा प्रश्न विचारला जातो. पण हे 'गुरु' म्हणजे नक्की कोण? त्यांची आपल्या आयुष्यात काय भूमिका असावी? आयुष्यात 'गुरु' करणं गरजेचं आहे का? आणि कोणाला 'गुरु' करावं? याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. म्हणूनच 'गुरु' या संकल्पनेबद्दल थोडी माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. 

'गुरु' शब्दाच्या व्याख्येपासूनच मी सुरुवात करते. 'गुरु' हा शब्द दोन धातूंपासून बनला आहे 'गु' - गुह्यत गुहायतर सत्ता म्हणजे कोणतंही रूप नसलेली, गुप्त, अदृश्य अशी ईश्वरीय शक्ती (अंधार). 'रु' - तत् रूपम् प्रकाशयती इति म्हणजे कोणत्याही जीवाचं दृश्य प्रकाश वा सौंदर्य. म्हणजेच जो स्वतःचं कोणतंही रूप न दर्शवता, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी वाट दाखवतो तो 'गुरु'. काही तज्ज्ञ 'गु' म्हणजे तिमिर आणि 'रु' म्हणजे नाशक असंही म्हणतात. जो तिमिराचा नाश करून आपल्याला प्रकाशात घेऊन जातो तो 'गुरु' अशी त्याची फोड होते. गुरु व्यासचरित गुरु गीता या ग्रंथात गुरुच्या अनेक व्याख्या आणि अर्थ दिले आहेत. स्कंद पुराणातील हा शंकर पार्वतीचा संवाद असून पार्वतीनं शंकराला जेव्हा 'गुरु'चा अर्थ विचारला त्याचं हे उत्तर आहे. 

 "गुकारश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते, अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः" ('गु' म्हणजे अज्ञानाचा अंध:कार व 'रु' म्हणजे प्रकाश. अज्ञानाला नष्ट करणारा ब्रह्मरुपी प्रकाश म्हणजेच 'गुरु'.)                       

"गुकारश्च गुणातीतो रूपातीतो रुकारक:, गुणरूपविहीनत्वात् गुरुरित्यभिधीयते" ('गु'कार म्हणजे गुणातीत आणि 'रु'कार म्हणजे रूपातीत. जो गुण आणि रूपांपलीकडला आहे तोच 'गुरु' होऊ शकतो.)                

आता ह्या व्याख्या जेवढ्या सोप्या वाटतात तेव्हढया प्रत्यक्षात निश्चितच नाहीत. यात आणखी काही गर्भितार्थ आहेत. त्यातला एक असा की एकूण ५० प्रकारचे श्वास आहेत. त्यातील पहिले ४९ हे 'रु' आहेत, जे भौतिक सुखासाठी आहेत. तर ५०वा 'गु' आहे जो अनंत शांततेसाठी आहे. जेव्हा आपण ५० वा श्वास पार करून निर्विकल्प समाधी पर्यंत जातो तेव्हा मोक्षप्राप्ती होते. तेव्हा आपण 'गुरु'लाही मागे टाकतो. इतका गुरु या शब्दाचा अर्थ खोल आहे. ज्या 'गुरु'नं ५० श्वास जिंकले आहेत आणि ज्याचा आत्मा ईश्वरीय शक्तीत विलीन झाला आहे अशा परमेश्वराशी एकरूप झालेल्या 'गुरु'ला 'सत्गुरु' ही उपाधी मिळते. प्रत्येक 'गुरु' हा 'सत्गुरु' नसतो.          

आता ह्या इतक्या मोठ्या व्याख्येत बसणाऱ्या किती व्यक्ती किंवा शक्ती आहेत याचा सारासार विचार करूनच आपण 'गुरु' निवडावा. 'गुरु' ही कोणी व्यक्ती किंवा मानवी अवतारच असला पाहिजे असं नाही. तर एखादी शक्ती जी आपल्याला योग्य मार्गदर्शन करते ती 'गुरु' होऊ शकते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्या मार्गदर्शक व्यक्ती येतात त्यांनाही आपण 'गुरु' म्हणतो. उदा: शिक्षक, जे शालेय काळात मार्गदर्शन करतात, किंवा नृत्य साधनेतही गुरु असतात इ. अगदी एखाद्या लहान वयाच्या व्यक्तीनं चांगलं मार्गदर्शन केलं तरीही ती व्यक्ती त्या वेळेपुरती 'गुरु'च असते. आई वडील आणि इतर वडीलधाऱ्या व्यक्तींनाही आपण 'गुरु' म्हणून मान देतोच. पण असं 'गुरु' म्हणणं आणि 'गुरु' करणं यात फरक आहे. हा भाग आपण आता नीट समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीला जर 'गुरु' करायचं असेल तर ते कायमस्वरूपी असतं. तात्पुरतं मार्गदर्शन किंवा मदत ह्यामुळे कोणी कायमचं 'गुरु' होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचा मला कितीही रास्त अभिमान असला तरीही व्यक्ती केवळ वयानं मोठी आहे म्हणून तिला 'गुरु' म्हणणं मला पटत नाही. उदा: आई - वडील योग्य वेळी आपल्या कल्याणासाठी मार्गदर्शन करतच असतात. त्या त्या वेळी ते 'गुरु'च असतात. पण त्यांना कायमचं 'गुरु' करता येईल का हा विचार आपण स्वतःच करावा. मोठ्या व्यक्ती कधी चुकत नाहीत किंवा त्या योग्यच मार्गदर्शन करतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. पण आपल्याकडील ह्या गोष्टीचा अतिरेक मला पटत नाही. कोणीतरी एखाद्या व्यक्तीबद्दलचा अनुभव, अध्यात्मिक अभ्यास वा सिद्धीप्राप्त व्यक्तीचं नाव सांगितलं तरीही परिपूर्ण 'गुरु' होण्याची योग्यता त्या व्यक्तीमध्ये आहे का याचाही विचार व्हायला हवा. वय, अध्यात्माचा अनुभव, सिद्धी यांचा 'गुरु' होण्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. चांगला 'साधक' चांगला 'गुरु' होऊ शकतोच असं नाही. पण आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टींचं अवडंबर आहे, जे काढून टाकण्याची नितांत गरज आहे.

'गुरु'ला वय, लिंगभेद, शिक्षण याचं कोणतंही बंधन नाही. शिष्याला योग्य मार्गदर्शन करणं हे 'गुरु' म्हणून एक कर्तव्य आहे. मग अशा वेळी खरंच 'गुरु' शिष्याला प्रकाशाकडे नेत आहे का? हे पाहावं. एखाद्या व्यक्तीला 'गुरु' केल्यावर वा करताना त्या व्यक्तीचं आंधळेपणानं अनुसरण केलं जातं. आज आपण इतक्या वाईट गोष्टी ऐकतो आहोत. कारण अशा पद्धतीचं अनुसरण करताना 'गुरु' नक्की कोणती 'आज्ञा' देत आहे याचा विचारच केला जात नाही. स्त्रियांना एकांतात बोलावणं, आर्थिक मागण्या करणं, स्वतःच्या नावाचा जप करायला सांगणं, स्वतः काही वस्तू विकणं, अतिमानवीय शक्तीचे प्रयोग ही एका 'गुरु'ची लक्षणं नक्कीच नाहीत. पूर्वीसारखी आता आश्रमसंस्थाही नाही. मग अशा गोष्टींना खतपाणी घालण्याआधी विचार करावा. कोणत्याही दैवताचा वा मानवी अवताराचा जप करण्यास काहीच हरकत नाही. पण कष्टाशिवाय कोणतंच फळ मिळत नाही. कष्ट करूनही अडचणी येत असतील तर जप साधनेचा आधार जरूर घ्यावा. पण केवळ जप करून काहीही साध्य होणार नाही हे भाविकांनी लक्षात घ्यावं.  

आयुष्यात 'गुरु'ची गरज असते का? असा एक प्रश्न नेहमी येतो. माझं स्पष्ट उत्तर आहे नाही- 'गुरु' असलाच पाहिजे असं काहीही नाही. किंवा त्यामुळे काही अपूर्णता येते असंही नाही. आपली कर्मं आणि वागणं यातून आपण आपलं भवितव्य घडवतो. त्यातल्या चुका दाखवून आपल्याला योग्य मार्गावर आणणारा 'गुरु' असू शकतो. पण कोणत्याही वेळी चांगला सल्ला देणारी व्यक्ती ही तात्पुरत्या का होईना 'गुरु'चंच काम करत असते. कोणताही कायमस्वरूपी 'गुरु' आपलं नशीब बदलू शकत नाही. म्हणूनच 'गुरु' नाही मिळाला तर आपण अपूर्ण आहोत ही भावना मनात नसावी. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला तात्पुरत्या काळासाठी 'गुरु' भेटतच असतात. नीट विचार केला तर अशा अनेक व्यक्ती या ना त्या कारणानं आपल्याला सन्मार्ग दाखवतच असतात. फक्त आपण ते रूप ओळखून त्या व्यक्तीनं केलेल्या उपकारांची जाणीव ठेवावी. अध्यात्मातील प्रगतीबद्दल बोलायचं तर एखादी ज्ञानी व्यक्ती सुद्धा त्या वेळी खूप चांगले मार्ग दाखवू शकते. बाकी आपली अध्यात्मिक प्रगती आपल्याच हातात असते.      

आयुष्यात एखादा 'गुरु' लाभला तरीही अतिरेक करू नये हे माझं स्पष्ट मत आहे. कोणत्याही भावनेचा अतिरेक न करता भक्ती करावी. भक्ती म्हणजे आंधळेपणानं वाहून घेणं नव्हे तर त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचा आदर करून त्या आत्मसात करायचा प्रयत्न करणं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदा एखाद्या व्यक्तीला वा शक्तीला 'गुरु' केलं तर ते कायमस्वरूपी असावं. कोणाचं तरी ऐकून वा कुठेतरी काही वाचून 'गुरु' बदलणं अयोग्य आहे. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे जे नवनवीन ग्रंथ वाचून 'गुरु' बदलत असतात. एखाद्या 'गुरु'ची शक्ती जेव्हा आपण स्वीकारतो त्यानंतर त्याची दुसऱ्या शक्तीशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक शक्तिरूपाची वेगळी अशी वैशिष्ट्य असतात. त्यामुळे आपण भौतिक सुखाच्या वा अध्यात्मिक प्रगतीच्या मागे धावत जाऊन सतत बदल करत राहणं नीतीमत्तेला धरून होत नाही. म्हणूनच 'गुरु' म्हणजे काय हे आधी समजून घेऊन सर्व विचाराअंति निर्णय घ्यावा.        
                                                  
कोणाला 'गुरु' करावं या संभ्रमात अनेक लोक असतात. 'गुरु' करण्यासाठी सिद्धीप्राप्ती, वारसा (ज्यांची आधीची पिढी 'गुरु' होती), वय, शिक्षण याचं कोणतंही परिमाण नसतं. तो मानवी अवतार असायला हवा असंही नाही. एखादी शक्ती, देवता (उदा: गणपती, शिव) किंवा सर्व गुण संपन्न मानवी अवतार यातील कोणीही आपला 'गुरु' होऊ शकेल. पण 'गुरु'कडे केवळ ज्ञान असून चालत नाही तर त्याचा यथायोग्य वापर कसा करायचा आणि शिष्याला प्रकाशाकडे कसं न्यायचं ह्यात पारंगत असणारी व्यक्तीच खरी 'गुरु' असते. कोणतीही अभिलाषा न बाळगता, आपल्या ज्ञानाचा गर्व न करता, शांत चित्तानं आपलं कर्म करणारी व्यक्तीच 'गुरु' होऊ शकते. कोणत्याही साधनेचा अतिरेक न करता शिष्याला योग्य उपासना (गरज असल्यासच) सांगून व्यावहारिक दृष्ट्या योग्य सल्ले देणारी व्यक्ती असेल तरच तिचा 'गुरु' म्हणून स्वीकार करावा. उदा: एखादा जप किंवा साधना शिष्याला करायला सांगितल्यावर ती जबरदस्तीनं शिष्यावर न लादता शिष्य स्वतःहून त्याचा भक्तीनं स्वीकार करेल असा उपदेश द्यायला हवा. शिवाय खरंच केवळ जपसाधनेची गरज आहे की काही इतर बदल करण्याची गरज आहे? याचा विचार करून शिष्याला भौतिक आयुष्यात ज्या गरजा आहेत त्याची पूर्तता करताना व्यावहारिक सल्ला द्यायला हवा. आपण अनेक मोठ्या अवतारी पुरुषांचं वर्णन वाचताना ते नग्नावस्थेत राहत असल्याचं आपल्याला जाणवतं. यामागील कारण नग्नतेच्या व्याख्येत दडलं आहे. 'नग्न' म्हणजे न= नाही ग्न= चिकटलेलं, ज्याला काहीही चिकटलेलं (वासना) नाही, ते नग्न (याच्या आणखी व्याख्याही आहेत, पण मी इथे रूपकातील व्याख्या दिली आहे). अशा प्रकारे सर्व वासनांपासून अलिप्त असणारी व्यक्ती सर्वार्थानं योग्य 'गुरु' असते. म्हणजे भौतिक दृष्ट्या ती विवस्त्र असली पाहिजे असं नसून भावनिक दृष्ट्या ती अलिप्त असायला हवी. षड्रिपू वा कोणत्याही सामाजिक बंधनांपासून मुक्त असणारी, मुक्त हस्तानं देणारी आणि ते देण्याची शक्ती असणारी अशी असावी. अशी व्यक्ती एखादं लहान बालक किंवा वृद्ध व्यक्ती वा एखादी देवताही असेल. आपलं आयुष्य कोणाच्याही आहारी न जाऊ देता, मोकळेपणानं जिथे भक्ती करता येईल अशा शक्तीस्थानाला 'गुरु' करावं हे माझं मत आहे. आपलं आयुष्य आपण आपल्या कर्मांनुसार जगतच असतो. त्यात चांगला 'गुरु' लाभला तर आयुष्य सन्मार्गी लागतं यात शंका नाही. पण 'गुरु'चा लाभ झाला नाही, तरी विधिलिखित टळणार नाही. 

जेव्हा 'गुरु' शिष्य म्हणून कोणाची परीक्षा घेऊनच त्याचा स्वीकार करतो तसंच 'गुरु'लाही प्रश्न विचारून किंवा त्यांची परीक्षा घेऊन स्वीकार करणं हे हिंदू धर्मात मोकळ्या मनानं स्वीकारलेलं आहे. अर्थात असा दोन्ही दृष्टिकोनातून विचार करणं काही भाविकांना पटत नाही. पण निष्ठा ही दोन्ही बाजुंनी हवी. शिष्याचा स्वीकार केल्यावर प्राथमिक अवस्थेत दीक्षा दिली जाते. दीक्षा म्हणजे शब्दशः सुरुवात. संस्कृत मधील 'दा' म्हणजे देणं आणि 'क्ष' म्हणजे नष्ट करणं  यांच्या संयोगानं 'दीक्ष' म्हणजे पवित्र करणं असा एक शब्द बनतो. म्हणजे 'गुरु' ज्ञान देऊन अज्ञानाचा नाश करतो. याचंच अजून एक रूप आहे. 'दी' म्हणजे ज्ञान आणि 'क्ष' म्हणजे क्षितिज किंवा सीमा. जेव्हा 'गुरु' जेव्हा शिष्याला सुरुवात करून देतो तेव्हा क्षितिजावर जसे पृथ्वी आणि आकाश एकत्र आल्यासारखे दिसतात तसंच शिष्य (पृथ्वी) आणि 'गुरु' (आकाश) यांची मनं एकरूप होऊन मनाच्या मर्यादा ओलांडून हृदयातून प्रवास सुरु होतो. अशी ही दीक्षा शिष्याच्या आयुष्याला एका वेगळ्या मार्गानं सुरुवात करून देते आणि वाईट गोष्टींचा अंत करून सन्मार्गानं पुढे जाण्यास मदत करते. शिष्याची योग्यता आणि गरज पाहून स्पर्श दीक्षा, मनो दीक्षा, शाम्भवी दीक्षा, स्वप्न दीक्षा, चक्षु दीक्षा इत्यादी ६४ दीक्षांपैकी कोणती दीक्षा द्यावी हे 'गुरु' ठरवतात. 'गुरु' आणि 'सत्गुरु' वेगवेगळ्या पद्धतीनं दीक्षा देतात. कारण 'गुरु' केवळ सुरुवात करून देतो पण 'सत्गुरु' मात्र शिष्याची जबाबदारी घेतात. 'गुरु' शिष्याला सुरुवात करून देतात पण 'सत्गुरु' मात्र शिष्याची जबाबदारी घेतात. काही ग्रंथांच्या मते 'सत्गुरु' स्वतःची थोडी आत्मिक शक्ती (प्राण) शिष्याला देतात आणि शिष्याची वाईट कर्मं स्वीकारून शिष्याचे भोग कमी करतात. अशी ही गुरु-शिष्य नात्याची सुरुवात होते आणि पुढे शिष्याला मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या मदतीनं वाटचाल करण्यास मदत होते. पण 'सत्गुरुं'चा लाभ होणं ही परम भाग्याची गोष्ट आहे, जी सहजासहजी घडत नाही.             

मी 'गुरु' या संकल्पनेबद्दल माहिती देण्याचा येथे प्रयत्न केला आहे. आजकाल अनेक तथाकथित 'गुरुं'मुळे भाविकांची फसवणूक होते, तसंच अनेक गैरसमज असल्यानं लोकांना 'गुरु' या संकल्पनेबद्दल संभ्रम आहे. तो दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शेवटी मी इतकंच सांगेन की 'गुरु', हितचिंतक, मार्गदर्शक, आदर्श व्यक्ती, ज्योतिषी यापैकी कोणीही असो, आपण कुठेही आंधळेपणानं अनुसरण न करता योग्य विचार करूनच कृती करावी आणि भावनेच्या आहारी जाऊ नये. 
   
टीप:  'गुरु' हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. मी येथे माझी मतं स्पष्टपणे मांडली आहेत. त्यांच्याशी प्रत्येकजण सहमत होईलच असं नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.         
                     
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी. 
      ==============================================

We many times hear somebody talking about their 'Guru'. Even as an astrologer, people seek help from me for getting a spiritual Guru. But what does the term 'Guru' exactly mean? Is it necessary to have a 'Guru' in life? What should be the role of the 'Guru' in our lives? and Who should be made a 'Guru'? Many such questions bother people in their day to day life. So here I am trying to explain the ideology behind the concept of a 'Guru'. 

I will start with the definition of a 'Guru'. The word 'Guru' is a combination of two syllables in Sanskrit. 'gu'- Guhyat guhayatar satta i.e. formless, hidden and invisible power of God (darkness). 'ru'-tat rupam prakashayati iti i.e. visible luster and beauty of a living being. So the one who formlessly guides to cross the darkness and move towards light is the 'Guru'. Some scholars define it as 'gu' is darkness and 'ru' is destroyer. Thus the one who dispels the darkness and illuminates life is the 'Guru'. Guru Gita authored by Guru Vyasa, describes many definitions and connotations of 'Guru'. It is a conversation between Shiva and Parvati when Parvati asked Shiva to teach her about 'Guru' and liberation.     

gu-kArascAndhakAro hi ru-kAras teja ucyate
ajJAna-grAsakaM brahma gurureva na saNshayaH  

('gu' is the darkness of ignorance and 'ru' is light. No doubt 'Guru' is the brahman who swallows ignorance.)

gu-kAras ca guNAtIto rUpAtIto ru-kArakaH
guNa-rUpa-vihInatvAt gururity abhidhIyate    

('gu' is beyond qualities, 'ru' is beyond forms. By the abandonment of qualities and forms, guru is thus defined.)
These definitions in reality are much unfathomable than they theoretically appear. There are more connotations to the term 'Guru'. Like, there are 50 types of breath. First 49 of them are 'ru' which are meant for materialistic enjoyments. And the 50th is 'gu' which is for extreme calmness. When we conquer the 50th breath, we reach Nirvikalp Samadhi and attain the salvation. We even overpower 'Guru' at this stage. The word 'Guru' has such a vast meaning. The 'Guru' who has conquered the 50 breaths and is a God realized soul, which is merged with the Universal Consciousness is called a 'Satguru'. Not every 'Guru' can get a title of 'Satguru'. 

We should choose a 'Guru' by rationally thinking which person or power (deity) can fit into the above mentioned definitions. It is not necessary that a 'Guru' should be a human incarnation or avatar. Any power which can guide us apropos of the requirements can be a 'Guru'. At different critical junctures of our life we meet various people who guide us and we genuinely call them 'Guru'. For example school teachers who guide us at school level or there are 'Guru's in the art of dance etc. Even a young person guides us at some stage can be considered as a 'Guru' at that moment. We also  respect our parents and other elderly people as sort of 'Guru's. But there is a huge difference in considering these people as 'Guru' and getting blessed by a real 'Guru'. Now lets understand this difference in detail. When a master is accepted as a 'Guru' then it is a permanent step. Though I am extremely proud of our Indian culture, accepting a person as a 'Guru' just on the basis of seniority is something I do not agree upon. For example our parents are always our well wishers and guide us from time to time. At many such points in life we respect them as 'Guru's. Well we should logically think that can we accept them as permanent 'Guru'? Nobody can assure that elderly people will guide us perfectly every time or they will not commit mistakes. I strongly oppose this superfluity in our culture. Though many people praise a person by sharing their experiences, or that person's spiritual knowledge or a Siddhi attained by the person, we should always check whether that person is really capable of becoming a 'Guru' or not. Age, spiritual experience or Siddhi are absolutely irrelevant criteria to become a 'Guru'. A capable 'Sadhak' may not become a capable 'Guru'. Sadly our culture has been misinterpreted and became ostentatious, which has to be corrected.    

A 'Guru' has no boundaries of age, gender, education etc. To guide a disciple is one of the prime duties of the the 'Guru'. So we should examine beforehand whether the 'Guru' is really illuminating a disciple's life or not? While accepting a person as a 'Guru' or after acceptance mostly people blindly follow the orders. Today many fraudulent 'Guru's are exposed. This happens merely because of the blind faith of the disciples and following the orders irrationally. Secret meetings with women, demanding money, ordering to chant 'Guru's name, selling self made products or showing paranormal powers are not the signs of a real 'Guru' The Ashrama system as in ancient times is also not existing now. So we all should think logically before encouraging such things. I do not object chanting any deity's name or a 'Guru's' name per se. There is no short cut for efforts. So even after putting all efforts, if somebody is facing some hurdles then one can definitely go for remedies like chanting mantras. But we should keep in mind that only chanting mantras will not help to get desired results.   

People always ask whether it is necessary to have a 'Guru' in life? I will straight forwardly answer it as NO- it is not necessary to have a 'Guru' in life. Or it will not make your life incomplete. We all make our future by our own deeds and the Karmas. There can be a 'Guru' who will point out the mistakes and help us to get on the right track. On the flip side, there are many people who guide us at various moments and are our 'Guru's at that point. Any permanent 'Guru' can not magically change our destiny. So we should not think that absence of a 'Guru' in life is making our life incomplete. We always come across some 'Guru' for a temporary period of time. If we keep our eyes open, there are many people who guide us and show us the right path. Just the thing is we should recognize their form and acknowledge their support. Talking about the spiritual progress, even some knowledgeable people guide us on this path too. Well our spiritual progress is in our hands, isn't it?
  
I strongly recommend that even if one gets a real 'Guru' in life one should not get carried away. A devotion should not cross the limits. As devotion does not mean blindly following somebody, but it is an appreciation of the efficacy and assimilation of the same. One more important point here is, if one makes a person or a power or deity a 'Guru' then it should be enduring. Changing the 'Guru' and inconsistency in faith by reading some texts or falling prey to other people's criticism is absolutely incorrect. I have seen some people who are not consistent with their concept of 'Guru' and change their 'Guru' after reading new texts. When we accept somebody as our 'Guru' we should not compare the capabilities of the him/her with those of another one. Every form of power is gifted with a special forte. So being inconsistent due to own materialistic and spiritual  demands is absolutely not justified. So we should be fully aware of the concept of 'Guru' before taking any decision regarding this matter.

Many people are muddled about the selection of a 'Guru'. Becoming a 'Guru' has no parameters like attaining Siddhi, inheritance, age, education etc. It may not be a human being but can be a power, a deity (like Shiva or Ganesha). Only knowledge will not make a master a 'Guru', but he/she should be well versed at using the knowledge in proper sense and illuminating a disciples' life. Only those will qualify to be at a position of a 'Guru' who do their duties without any expectations and getting puffed up with conceit. A 'Guru' who will suggest a worship (only if needed) and give practical solutions, should be accepted. For example if any worship is recommended by the 'Guru', it should not be forced on the disciple, rather the disciple should understand and follow it with full heart. Along with this the 'Guru' should also take into account that whether any worship is required or any practical change is needed for the wellness of the disciple to fulfill his materialistic needs. While reading about these religious masters we often come across the information that these masters used to live or wander naked. The secret behind this lies in the definition of nakedness or 'Nagna' in Sanskrit. It derived from the Sanskrit root 'na'= No 'gna=attached; i.e. Nagna (Naked) is the one who is detached from everything (it has various definitions, but I have given the metaphorical meaning here). So the one who is detached from any kind of lust (emotion) is a proper 'Guru'. This doesn't mean the 'Guru' should be naked in practical sense but he should be emotionally empty. 'Guru' should be free from Shadripu or six enemies (viz; desire, anger, greed, pride, fascination and jealousy), wishing to give and able to give. It can be a child or an aged person or a deity. I opine that we should accept such a power as 'Guru' where we can worship with free will, without getting carried away or forced. We live our destined life depending on our karmas. During our progress if we luckily meet a real 'Guru', it will definitely help to enlighten our life. Nonetheless if we are not blessed by a 'Guru', it will not change out destiny. 

Ideally a 'Guru' has a room to evaluate and accept or reject a disciple. At the same time questioning and evaluating a guru and then surrendering to him is perfectly acceptable in Hinduism with a broad view. Of course this two way thinking is probably not digested by many followers. Nevertheless I think loyalty should be cross checked for both the sides. After accepting the disciple the 'Guru' takes the first step i.e. Diksha. Diksha literally means initiation. It is derived from Sanskrit root 'da' means to give and 'ksa' means to destroy. Combining these roots the word 'Diksa' means to consecrate has developed. It means a 'Guru' dispels adyana or ignorance by providing dnyana or knowledge. It can also be derived by another definition. 'di' is intellect and 'ksa' is the horizon or the end. When the disciple is initiated by a 'Guru' their mind unite kust like earth surface and the sky line meets at horizon. The mind of 'Guru' (sky) meets with the mind of the disciple (Earth) to transcend and the journey becomes of the heart. This way Diksha will help the disciple to start a new life on a new path by dispelling all darkness and move towards light. By evaluating the capability and needs of the disciple, 'Guru' decides which Diksha out of the 64 Dikshas viz; sparsha diksha (touch), mano diksha (mind), swapna diksha (dream), chakshu diksha (eyes), shambhavi diksha etc. is to be given. 'Guru' and 'Satguru' bless the disciples with different kinds of Dikshas. As 'Guru' initiates the guidance while 'Satguru' takes the responsibility of the disciple to major extent. According to some texts 'Satguru'  transmits a small portion of his vital energy (Prana) into the disciple and absorbs the accumulated karmas of the disciple to reduce the suffering. This is how a relation of 'Guru' and disciple starts and helps the later to start the quest with full vim. One has to be very fortunate to get blessed by a 'Satguru', which is not as easy as it seems.

I tried to explain the concept of 'Guru' in this article. Now a days many so called 'Guru's are exposed and followers fall prey to the trickery. Also there are many misconceptions which lead to the confusion regarding the conceptualization of 'Guru'. Lastly I would like to mention that it may be 'Guru' or a well wisher, guide, idol or an astrologer we should not follow anybody blindly and should take any decision with logical thinking. 

Note: 'Guru' is a part of everybody's belief. I have vividly expressed my opinions here. Every reader may not agree to it. This article is not intended to hurt anybody's feelings.        

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
      =============================================
                

No comments:

Post a Comment